आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या व्यापार करारात देशाला विकले असल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला… लोकसभा अध्यक्षांच्या अंगावर कागदपत्रे भिरकवण्याच्या आरोपाखाली काँग्रेसच्या सात खासदारांचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबन करण्यात आले… कल्याणमधील ठाकरे गटाचे दोन नगरसेवक लवकरच आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… पिंपरी-चिंचवड महापालिकेत सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षात महापौरपदावरून नाराजी उफाळून आली… राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ… पंतप्रधाननरेंद्र मोदीयांनी अमेरिकेच्या व्यापार करारात देश विकला, असा गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलताना केला. इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या भाषणावर विरोधी पक्षनेत्याला बोलू दिले नाही. जनतेला याबद्दल विचार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. चार फेब्रुवारीपासून रडखडलेल्या अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारावर मोदींनी २ फेब्रुवारीला सायंकाळी स्वाक्षरी केली. त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. हजारो कोटींनी बांधलेला मोदींच्या प्रतिमेचा फुगा फुटणार आहे. आमचे पंतप्रधान धोक्यात आले आहेत. अमेरिकेत अदानींवर असलेला खटला प्रत्यक्षात मोदींवरच आहे. तसेच, एपस्टीन फाइल्सचा संदर्भ देत, अजूनही काही माहिती जाहीर व्हायची असल्यामुळे सरकारवर दबाव आहे. ही दोन मोठी दबावाची कारणे आहेत, असेही राहुल म्हणाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अंगावर कागदपत्रे भिरकवल्याच्या आरोपाखाली इंडिया आघाडीच्या आठ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामध्ये काँग्रेसच्या सात आणि माकपच्या एका खासदाराचा समावेश आहे. अमरिंदर सिंग राजा वारिंग, डीन कुरियाकोसे, किरण कुमार रेड्डी, माणिकम टागोर, गुरजीत सिंग औजला, हिबी एडन, एस. वेंकटेश्वरन आणि प्रशांत पडोळे अशी निलंबित खासदारांची नावे आहेत. यातील प्रशांत पडोळे हे महाराष्ट्रातील भंडाऱ्याचे खासदार आहेत. हे सर्व खासदार आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नाहीत. लोकसभा अध्यक्षांच्या या कारवाईचा काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी चीनचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सभागृहात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सभापतींनी त्यांना बोलण्याची परवानगी नाकारली. या गोंधळादरम्यान विरोधी पक्षाचे खासदार टेबलांवर चढले आणि त्यांनी सभापतींच्या दिशेने कागदपत्रे फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळेच या खासदारांचे निलंबन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आणखी वाचा :सोने-चांदीचे दर आणखीनच कोसळणार की वाढणार? गुंतवणूकदारांनी काय करावे? तज्ज्ञ काय सांगतात? कल्याणमधील ठाकरे गटाचे दोन नगरसेवक लवकरच आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. मंगळवारीकल्याण डोंबिवलीपालिकेतील महापौर निवडीच्या वेळी ठाकरे गटाच्या नऊ नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक अनुपस्थित होते. या तिन्ही नगरसेवकांना पक्षाने सभागृहात उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. या तीन नगरसेवकांपैकी दोन नगरसेवक राजीनामा देणार असल्याची कुजबुज आमच्या कानावर आली असल्याचे ठाकरे गटाचे पालिकेतील गटनेते उमेश बोरगावकर यांनी सांगितले. मात्र, ते दोन नगरसेवक कोण हे सांगण्यात त्यांनी नकार दिला. सभागृहात गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे बोरगावकर यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यांचे खुलासे आल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असेही बोरगावकर म्हणाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षात महापौरपदावरून नाराजी उफाळून आल्याचे वृत्त आहे. महापौरपदासाठी इच्छुक असताना उपमहापौरपदाची उमेदवारी जाहीर झाल्याने नाराज शीतल शिंदे अर्ज दाखल न करताच महापालिका मुख्यालयातून बाहेर पडले. महापौरपदासाठी रवि लांडगे आणि उपमहापौरपदासाठी ऐनवेळी शर्मिला बाबर यांचा अर्ज दाखल झाला. महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपामध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापौरपदासाठी रवि लांडगे आणि उपमहापौरपदासाठी शीतल शिंदे यांचे नाव निश्चित केले. त्याबाबतचे पत्र शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना पाठविले आहे. यादरम्यान महापौरपदासाठी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. हेही वाचा :सुनेत्रा पवारांआधी जानकी रामचंद्रन यांनीही अशीच घेतली होती मुख्यमंत्रीपदाची शपथ, MGR यांच्या मृत्यूनंतर जयललितांचं काय झालं होतं ? राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्रीपंकजा मुंडेयांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली. पंकजा मुंडे या सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ येथे आलेल्या होत्या. यावेळी त्यांनी पिशोर, घाटनांद्रा, चौका, आडगाव, बजाजनगर आदी ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. सोमवारी सायंकाळी शहरातच मुक्काम केल्यानंतर त्या मंगळवारी सकाळी लातूर, धाराशिव व सोलापूर या तीन जिल्ह्यातील त्यांच्या नियोजित सभांसाठी हेलिकॉप्टरने जाणार होत्या. सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचा पुढील नियोजित दौरा निश्चित होता. या दौऱ्यासाठी निघण्याची तयारी सुरू असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मंत्री पंकजा मुंडे यांचे उड्डाण काही काळ रखडले. बिघाडाच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास होऊ शकत नाही, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर मुंबई येथून दुसरे हेलिकॉप्टर मागवण्यात आल्याची माहिती पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय तथा भाजपाचे कार्यकर्ते प्रवीण घुगे यांनी दिली.
अमेरिकेच्या व्यापार करारात मोदी भारताला विकून टाकतात, राहुल गांधींचा आरोप
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.