भुलेश्वर :पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दिवसभर तापमानात लक्षणीय वाढ झाली होती. दुपारनंतर अचानक जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका होता की अनेक ठिकाणी कांदा बियाण्यांची पिके भुईसपाट झाली. सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह गारांचापाऊससुरू झाला. माळशिरस, टेकवडी, राजेवाडी, पारगाव आणि नायगाव या भागात गारपीट व वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला. सुमारे एक तास चाललेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील कांदे, गहू, हरभरा आणि ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. याशिवाय आंब्याच्या झाडांवरील मोहर व कैऱ्या, डाळिंब, तसेच फुलझाडांचेही वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आहे. दरवर्षीप्रमाणे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पिसर्वे येथील प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र आबा कोलते यांनी सांगितले की, मका, कडवळ, कांदा गोट बी, कलिंगड, काकडी, पालक आदी पिकांचे गारांमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे पूर्व भारतातील पिकांवर परिणाम
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.