दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा I। - या तुकोबारायांच्या पंक्तींची तंतोतंत प्रचिती देणारी खळबळजनक घटनानाशिकमध्येउघडकीला आली आहे. स्वतःला ‘कॅप्टन‘ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात नावाच्या वासनांध भोंदूबाबाच्या लीलांचे गलिच्छ तपशील बाहेर आल्याने लोक संतापले आहेत. पतीच्या मृत्यूची भीती दाखवून एका महिलेवर अत्याचार, सोबत तब्बल ५८ व्हिडिओ अशा काळ्या कृत्याचे या खराताचे भांडे तर फुटलेच, वरून आपली राजकीय व्यवस्था किती किडलेली, सारासार विवेक गमावलेली आहे, हेही चव्हाट्यावर आले. हा केवळ एका गुन्हेगाराचा भांडाफोड नाही; तो राजकीय वास्तवाचे सडलेले प्रतिबिंब दाखवणारा आरसा आहे. महिलांचे शोषण, मानसिक गुलामी, अंधश्रद्धेच्या नावाखाली विकृत कारभार हे सारे संतापजनक आहेच; पण त्याहून अधिक धक्कादायक आहे ती या बाबाच्या दरबारात बडे राजकीय नेते, उच्च पदस्थांची लागणारी रांग. समस्यांनी ग्रासलेला, परिस्थितीने पिचलेला सामान्य माणूस अशा बुवाबाबांच्या आश्रयाला जाणे, त्यांच्या कच्छपी लागून सर्वस्व गमावण्याइतका आंधळा व हतबल होणे एकवेळ समजून घेता येईल. पण ज्यांच्या हाती सत्ता, संपत्ती, यंत्रणा अशी सारी सूत्रे आहेत, त्या बड्या नेत्यांनी या असल्या टीनपाट भोंदूंच्या मागे का लागावे? या मंत्री-संत्री लोकांची अशी काय हतबलता असते की भलत्या चमत्कारांचे दावे करणाऱ्या कुण्या बाबाचे पाय धुवून पुसण्याची गरज त्यांना भासावी? मुख्यमंत्री, मंत्री वा तत्सम पदे भूषविलेले सत्ताधारी- विरोधक, पुरुष-महिला या सगळ्यांचीच या खराताच्या ‘दरबारात’ लागणारी उपस्थिती केवळ योगायोग नाही. त्यामागे प्रामुख्याने तीन कारणे असतात - असुरक्षितता, लालसा आणि काळे व्यवहार. सत्तेवरील लोकांना भीती असते ती सत्ता गमावण्याची.निवडणूक जिंकायची, खुर्ची टिकवायची, प्रतिस्पर्ध्याला हरवायचे या सगळ्यासाठी ‘काहीही’ करण्याची मानसिकता प्रसंगी कोणत्या टोकाला जाते याचे सांप्रत काळीचे दाखले कित्येक हजार. पण अंधश्रद्धेच्या कर्दमात सामान्यांना लोटून सर्व प्रकारचे भोग सुखनैव भोगणाऱ्या असल्या बाबांच्या पायी लीन होणारे, त्यांची पूजा-अर्चा करणारे राजकीय नेते ही ऱ्हासाची नक्की कोणती पातळी म्हणायची? हे सत्ताधारी किंवा सत्तेच्छू लोक चक्क वासनांधांच्या दरबारात हजेरी लावून असे लवलवून वाकतात याचे दुसरे कारण लालसा. सत्ता, तिच्यातून मिळणारा अमाप पैसा आणि वाढता प्रभाव यातून आपण कुणाला प्रतिष्ठा देतो आहोत, हे समजून घेण्याचे भान राहात नाही. तिसरे कारण आहे काळे व्यवहार लपवण्याची धडपड. काळा पैसा पांढरा करण्यासाठी, चौकशा थांबवण्यासाठी किंवा ‘वरच्या’ स्तरावरून संरक्षण मिळवण्यासाठी अशा भोंदूंचा वापर केला जातो, हे आता गुपित राहिलेले नाही. अशोक खरात प्रकरणात पुढाऱ्यांच्या या जवळिकीपेक्षा अधिक धक्कादायक आहे ते, ज्यांच्यावर राज्यभरातील महिलांच्या संरक्षणाची घटनादत्त जबाबदारी त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर याच कथित ‘कॅप्टन’च्या देवस्थानाच्या विश्वस्त असाव्यात आणि महिलांचे शोषण करणाऱ्या या बाबासोबतचे त्यांचे व्हिडिओ, छायाचित्रे अटकेनंतर काही तासांत सोशल मीडियात यावीत! म्हणून किमान या भोंदूच्या काळ्या कृत्याचा न्यायनिवाडा न्यायालयात होईपर्यंत नैतिक जबाबदारी म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पद सोडायला हवे. खरात प्रकरणाच्या तपशिलांमुळे एकीकडे सामान्य माणूस संतापलेला असताना त्यातल्या त्यात सकारात्मक बाब म्हणजेनाशिकचेपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी राजकीय दडपणाला न जुमानता केलेली कारवाई. ही केवळ एका आरोपीवरची कारवाई नाही; ती व्यवस्थेतल्या कणखरपणाची झलकदेखील आहे. मात्र, अशी कारवाई अपवाद न ठरता नियम ठरावा. या प्रकरणात फक्त अशोक खरात नावाचा इसम दोषी नाही. त्याच्या दरबारात उपस्थित राहून त्याला वैधता, प्रतिष्ठा देणारे राजकीय चेहरेही तितकेच जबाबदार आहेत. ‘आम्ही फक्त दर्शनाला गेलो होतो’ हा त्यांचा बचाव आता यंत्रणेने आणि जनतेनेही चालवून घेता कामा नये. ज्यांनी विवेक, विज्ञाननिष्ठा आणि कायद्याचा आदर राखायचा, तेच जर अंधश्रद्धेच्या पायाशी लोटांगण घालत असतील, तर सामान्य माणसाने कोणावर विश्वास ठेवायचा? गावोगावी भोंदूबाबा उगवतात, कारण त्यांना पोसणारी राजकीय माती सुपीक असते. ती माती बदलली नाही तर आजचा खरात जाईल आणि उद्या दुसरा ‘कॅप्टन’ उभा राहील. कदाचित आणखी प्रभावी, आणखी धोकादायक. तेव्हा या थोतांडाचा निकाल जनतेच्या दरबारातही लागला पाहिजे. न्यायव्यवस्थेने त्याचा चाैरंग करायला हवा आणि भोंदू भोगसम्राटांच्या पायावर झुकणाऱ्या राजकीय नेत्यांना जनतेने रोकडा जाब विचारायला हवा.
छळ आणि शोषणः राजकीय वास्तवाचे सडलेले प्रतिबिंब
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.