Ashok Kharat News : 'हायप्रोफाइल' स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याने सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरासह स्थापन केलेले शिवनिका संस्थान ट्रस्टही चर्चेत आले आहे. या मंदिराला अनेक राजकीय नेत्यांनी भेटी देतानाच ट्रस्टवर राजकीय क्षेत्रातील मातब्बरांची वर्णी लावलेली असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. खरात याने सुमारे १७ वर्षापूर्वी सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात श्री ईशान्येश्वर मंदिराची अंकशास्त्राच्या आधारे नदीच्या ईशान्य कोपऱ्यात उभारणी केली. या मंदिराचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी शिवनिका संस्थान नावाने ट्रस्ट निर्माण करून त्यावर राज्यातील मातब्बर लोकांची वर्णी लावली. तेव्हापासून खरात अधिक चर्चेत आला. ईशान्येश्वर मंदिराची उभारणी केल्यानंतर शिर्डीला येणारे अनेक भाविक सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या कडेला मिरगाव शिवारात असलेल्या मंदिरात दर्शनासाठी यायचे. यात अनेक बडे राजकारणी, उद्योजक व कलाकारांचा समावेश होता. या मंदिराची उभारणी करतांना खरात यांनी मोठा गाजावाजा केला होता. मंदिराच्या कळसाची उंची किती पाहिजे, गाभारा केवढा पाहिजे, पायऱ्या किती असाव्यात, मंदिराचा मुख्य दरवाजा, नंदी, मंदिराचा दगड आणि पिंड कशी असावी असे सर्व अंकशास्त्रानुसार निकष लावून या मंदिराची उभारणी करण्यात आल्याचे सांगण्यात यायचे. त्यामुळे ईशान्येश्वर मंदिर अधिक चर्चेत आले होते. देश, विदेशातून खरात याचे शिष्य या मंदिरात पूजेसाठी येत होते. १३ ऑगस्ट २००९ रोजी श्री शिवनिका संस्थान, मिरगाव या नावाने ट्रस्टची नोंदणी करण्यात आली होती. तेव्हापासून यावर संचालक मंडळ अस्तित्वात असून त्यावर अशोक खरात हा अध्यक्ष आहे. या शिवनिका संस्थानच्या माध्यमातून त्याने अनेक समाजोपयोगी उपक्रम देखील राबविले आहेत. त्यामुळे परिसरात त्याच्या नावाचा दबदबा वाढला होता. आलिशान बंगला आणि शेती सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात श्री ईशान्येश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस खरात यांचा अलिशान बंगला आणि शेती आहे. याठिकाणी आंब्याची बाग लावण्यात आली असून समोर श्री शिवनिका संस्थानचा मोठा सभामंडप बांधण्यात आला आहे. याठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमाला नेहमीच देशभरातून मोठ्या प्रमाणावर गर्दी असायची. संचालक मंडळाच्या नावांचा फलक गायब.. श्री ईशान्येश्वर मंदिराच्या सभामंडपात श्री शिवनिका संस्थानच्या संचालक मंडळाच्या नावाची पाटी (फलक) लावण्यात आली होती. मात्र खरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर रातोरात याठिकाणी असलेली संचालक मंडळाचा फलक गायब झाल्याची चर्चा होती. श्रावणात, गुरुपौर्णिमेला चाकणकरांची उपस्थिती खरात यांनी स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थान, मिरगाव या संस्थानवर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या ट्रस्टी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक कार्यक्रम, महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमांना व गुरूपौर्णिमेला चाकणकर या उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. सदर फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी चाकणकर यांना आता लक्ष्य करणे सुरू केले असून, त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी होऊ लागली आहे. दोन वर्षांपूर्वी शिवनिका ट्रस्टमध्ये बदल... शिवनिका ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील व काही बाहेर जिल्ह्यातील प्रतिष्ठित या ट्रस्टचे संचालक होते. मात्र दोन वर्षापूर्वी तीन ट्रस्टींनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. तेव्हाच काहीतरी गडबड असल्याची चर्चा सुरू झाली होती. तर काही जुने ट्रस्टी कायम ठेवून नवीन ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. त्यावर खरात यांच्या पत्नी यांना सरचिटणीस बनविण्यात आले होते. खरात आहे बहुभाषिक; १५४ देशांचा प्रवास ६७ वर्षीय खरात हा मूळचे सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) येथील भूमिपुत्र आहेत. शालेय शिक्षणानंतर ते अचानक गायब झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर अनेक वर्षानंतर ते प्रकटले आणि आपण मर्चेंट नेव्हीमध्ये कॅप्टन पदावर असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. २२ वर्षे नेव्हीमध्ये नोकरी केल्यानंतर १५४ देशांमध्ये ते फिरल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांना अनेक देशांच्या व प्रांताच्या भाषा बोलता येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते बहुभाषिक आहेत. त्यांना अनेक देशांच्या धार्मिक चालीरिती, परंपरा आणि संस्कृतीचा अभ्यास असल्याचेही कळते.
ज्योतिषीच्या अटकेमुळे ट्रस्ट आणि मंदिराची चौकशी सुरू
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.