Achira News Logo
Achira News

थेट ट्रेलर सादरीकरणासह मराठी चित्रपटगृहाने नवा कल प्रस्थापित केला

Sakal
थेट ट्रेलर सादरीकरणासह मराठी चित्रपटगृहाने नवा कल प्रस्थापित केला
Full News
Share:

Marathi Entertainment News : मराठी रंगभूमीवर एक आगळावेगळा आणि धाडसी प्रयोग नुकताच यशस्वीरित्या पार पडला. ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ या आगामी नाटकाचा ट्रेलर पहिल्यांदाच थेट रंगमंचावर लाईव्ह परफॉर्मन्सच्या स्वरूपात सादर करण्यात आला आणि प्रेक्षकांनी त्याला टाळ्यांच्या कडकडाटात जबरदस्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी माटुंगा पश्चिम येथील यशवंतराव नाट्यगृहात रंगलेल्या ‘जर तर ची गोष्ट’ या गाजलेल्या नाटकाच्या ३५० व्या प्रयोगादरम्यान हा अनोखा लाईव्ह ट्रेलर सादर करण्यात आला. नाटकाच्या मध्यंतरात कलाकारांनी रंगमंचावर येत ‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ची झलक जिवंत अभिनयातून उभी केली. संगीत, प्रकाशयोजना आणि प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून सादर झालेला हा ट्रेलर प्रेक्षकांना नाटकाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा ठरला.या अभिनव प्रयोगामुळे रंगभूमीवरील ट्रेलर सादरीकरणाची पारंपरिक पद्धत मोडीत निघाली असून, मराठी नाट्यविश्वात एक नवा ट्रेंड सेट झाल्याची चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांनीही या प्रयोगाला मोठ्या उत्साहाने दाद दिली.‘आमच्या पिढीची गोष्टच वेगळी!’ हे नाटक एका कुटुंबातील तीन वेगवेगळ्या पिढ्यांच्या जगण्यातील, विचारांतील आणि नात्यांतील मजेशीर प्रवास उलगडणार आहे. हलक्याफुलक्या ढंगात मांडलेली ही कथा हसत-खेळत प्रेक्षकांना विचार करायला लावणारी ठरेल. येत्या ९ मे रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग रंगभूमीवर सादर होणार आहे.दिग्दर्शक अद्वैत दादरकर म्हणतात, “लाईव्ह ट्रेलर हा आमच्यासाठी एक छोटा नाट्यानुभव होता. काही मिनिटांत प्रेक्षकांना नाटकाच्या जगात घेऊन जाणं, त्यांना हसवणं आणि उत्सुकता निर्माण करणं हे खरं आव्हान होतं. प्रेक्षकांनी दिलेली तात्काळ प्रतिक्रिया पाहून आम्हाला जाणवलं की, हा प्रयोग योग्य दिशेने गेला.”निर्माते नंदू कदम म्हणतात, “नाटकाची ओळख प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना काहीतरी वेगळं करायचं होतं. ट्रेलर हा फक्त दाखवण्यापुरता न राहाता तो अनुभवण्यासारखा व्हावा, हा आमचा प्रयत्न होता. रंगमंचावरच ट्रेलर सादर केल्यावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया थेट समजते आणि ती खूपच उत्साहवर्धक होती. अशा प्रकारचे प्रयोग पुढेही करायला आम्हाला नक्कीच आवडेल.''प्रिया बापट म्हणते, ''हे नाटक प्रेक्षकांना आपलसं वाटणारं आणि मनोरंजन करणारं आहे. त्या नाटकाची झलक ट्रेलरमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला तीच ऊर्जा आणि मजा जिवंत ठेवायची होती. लाईव्ह ट्रेलरमुळे प्रेक्षकांना नाटकाचा मूड लगेच कळला आणि त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद होतोय.”

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Sakal

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

थेट ट्रेलर सादरीकरणासह मराठी चित्रपटगृहाने नवा कल प्रस्थापित केला | Achira News