शेजारील देश असलेल्यानेपाळच्याराजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (आरएसपी) ऐतिहासिक विजय नोंदवला असून, आता देशाची धुरा तरुण आणि डॅशिंग नेते बालेंद्र शाह ऊर्फ 'बालेन' यांच्या हाती जाणार आहे. येत्या २७ मार्च रोजी बालेंद्र शाहनेपाळच्यापंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ५ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या २७५ सदस्यीय प्रतिनिधी सभेच्या निवडणुकीत आरएसपीने १८२ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयामुळे नेपाळमधील जुन्या आणि प्रस्थापित पक्षांना मोठा धक्का बसला आहे. आरएसपीने निवडणुकीपूर्वीच बालेंद्र शाह यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित केले होते, ज्याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. पक्षाचे अध्यक्ष रवि लामिछाने, ज्येष्ठ नेते बालेंद्र शाह आणि स्वर्णिम वाग्ले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शपथविधीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी २६ मार्च रोजी पार पडेल आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, २७ मार्चला बालेंद्र शाह पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारतील. विशेष म्हणजे, नेपाळच्या संसदेचे नवीन भवन अद्याप पूर्णपणे तयार नसल्यामुळे हा सोहळा एका तात्पुरत्या हॉलमध्ये आयोजित केला जाणार आहे. संसद सचिवालयाचे प्रवक्ते एकराम गिरी यांनी सांगितले की, कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून ध्वनी आणि प्रकाश व्यवस्थेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या निवडणुकीत नेपाळी काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी १०० पारची घोषणा देणाऱ्या नेपाळी काँग्रेसला केवळ ३८ जागांवर समाधान मानावे लागले. पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार गगन थापा यांचा आरएसपीच्या अमरेश सिंह यांनी पराभव केला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत गगन थापा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय सीपीएन-यूएमएलला २५, तर कम्युनिस्ट पार्टीला १७ जागा मिळाल्या आहेत. निवडणूक आयोगाचे कार्यवाह मुख्य आयुक्त राम प्रसाद भंडारी यांनी निवडणुकीचे अंतिम निकाल राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांना सादर केले. अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीतही निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले आहे.
नेपाळच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचा ऐतिहासिक विजय, बालेंद्र शाह होणार पंतप्रधान
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.