लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा :भाजपकडून फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रवी नाईक यांचे पुत्र रितेश यांना गुरुवारी उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर आम आदमी पक्षाने गीतेश नाईक यांना तिकीट दिले आहे. तर रितेश यांना उमेदवारी जाहीर होताच विश्वनाथ ऊर्फ अपूर्व दळवी हे प्रचंड नाराज झाले. दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्यही उपस्थित होते. दळवी समर्थकांनी खडपाबांध येथे बैठक घेत लवकरच पुढील निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. त्यामुळे दळवी यांनी बंडाची तयारी केल्याची चर्चा आहे. दरम्यान, दळवी यांचे मन वळविण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे त्यांची भेट घेणार आहेत. मतदारसंघात आता रितेश नाईक, काँग्रेसचे डॉ. केतन भाटीकर आणि आपचे गीतेश नाईक अशी तिरंगी अथवा बहुरंगी लढतीची शक्यता व्यक्त होत आहे. गुरुवारी तिकीट जाहीर होताच रितेश नाईक यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. गेल्या ३५-४० वर्षापासून त्यांच्या वडिलांना मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्याप्रमाणेच यावेळीही साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी फोंडावासीयांना केले आहे. रितेश यांनी दिवंगत रवी नाईक यांचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. तसेच सर्वांशी समन्वयाने काम करू असे त्यांनी स्पष्ट केले. फोंड्यात वातावरण तापले, खडपाबांध येथे शक्तिप्रदर्शन पोटनिवडणुकीसाठी रितेश नाईक यांना उमेदवारी जाहीर झाल्याने बंडाळी अटळ असल्याचे चित्र गुरुवारी संध्याकाळी निर्माण झाले. दुपारी सुमारे साडेचारच्या सुमारास विश्वनाथ (अपूर्व) दळवी यांच्या समर्थकांनी खडपाबांध येथे मोठे शक्तिप्रदर्शन केले. दळवी यांच्या घरासमोर समर्थक, कार्यकर्ते जमल्याची माहिती मिळताच प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, सर्वानंद भगत आदींनी खडपाबांध येथे दळवी यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी दळवी समर्थकांनी नाईक यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दळवी यांनाच उमेदवारी मिळायला हवी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. विश्वनाथ दळवी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजोपयोगी अनेक कामे केली आहेत. ते कार्यकर्त्यांनी किंवा नागरिकांनी हाक मारताच धावून जातात. पक्षासोबत ते एकनिष्ठ राहिलेले आहेत. त्यांची कदर म्हणून भाजपने त्यांच्या नावाचा विचार करायला हवा होता, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. राजकारणातचढ-उतार येतातच : दामू नाईक दरम्यान, निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष नाईक, विनय तेंडुलकर हे विश्वनाथ दळवी यांच्यासह तेथून बाहेर पडले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, 'विश्वनाथ दळवी हे एक परिपक्वराजकारणीआहेत. गेली अनेक वर्षे ते पक्षासोबत आहेत. पुढेसुद्धा ते सोबत राहतील. प्रामाणिक कार्यकर्ता अशी त्यांची आजपर्यंतची ओळख आहे. पक्ष म्हणून जो वरिष्ठ पातळीवर निर्णय होतो, त्या निर्णयाशी प्रत्येक कार्यकर्ता बांधील असायला हवा. राजकारणात क्षणिक विचार चालत नाही. दीर्घकाळाचा विचार करून निर्णय घेतले जातात. दळवी यांनीसुद्धा त्यादृष्टीने विचार करावा, राजकारणात चढउतार हे असतातच. काहीवेळा मनाविरुद्ध प्रसंगही घडतात. सर्वांचा सारासार विचार करून सामोरे जायला हवे. मीसुद्धा अशा चढ-उतारामधूनच घडलो आणि आज भाजपचे सर्वोच्च पद माझ्याकडे आले आहे. कार्यकर्त्यांची बैठक त्यानंतर दळवी यांच्या घरी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात एक बैठक घेऊन आपला रोष व्यक्त केला. बैठकीला माजी नगराध्यक्ष व माजी भाजप मंडळ अध्यक्ष शांताराम कोलवेकर, नगरसेवक शौनक बोरकर, शिवानंद सावंत यांसह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीमध्ये आता विश्वनाथ दळवी हे जो काही निर्णय घेतील, त्यामागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहायचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. स्थानिक मागणी प्रभावी रवीं यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाला पुढे नेण्यासाठी त्यांचे पुत्र रितेश यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी स्थानिक स्तरावरून पुढे आली. सरकारातील भाजपचा मित्र पक्ष मगोपनेही याला पाठिंबा दर्शवला होता. आमदार गोविंद गावडे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रितेश यांना तिकीट देण्याची भूमिका घेतली होती. विरोधक मित्रच, फोंड्यात विजय आमचाच : रॉय दरम्यान, रॉय नाईक यांनी विरोधकांबाबत 'ते आमचे मित्रच आहेत' असे म्हटले आहे. फोंडा पोटनिवडणुकीत भाजपने रितेश यांना उमेदवारी दिल्याने सर्वजण एकत्रितपणे काम करतील, असा विश्वास रॉय यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा दावा त्यांनी केला. आपकडून गीतेश नाईक यांना तिकीट दरम्यान, आम आदमी पक्षाने फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गीतेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गीतेश हे फोंडा मतदारसंघातील एक परिचित नाव असून, त्यांनी स्थानिक पातळीवर सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली आहे. गीतेश नाईक यांनी सुरुवातीला स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवत आपली ओळख निर्माण केली. पारंपरिक पक्षांपासून वेगळा पर्याय म्हणून त्यांनी 'आप'मध्ये प्रवेश केला. गोव्यात 'आप' पक्ष विस्तार करत असताना, नव्या चेहऱ्यांवर भर देण्याच्या धोरणात त्यांना संधी मिळाली. रितेश यांचे केले अभिनंदन विश्वनाथ दळवी यांची समजूत काढल्यानंतर दामू नाईक हे खडपाबांध येथे रितेश नाईक यांच्या घरी गेले आणि त्यांचे अभिनंदन केले. यावेळी नाईक म्हणाले, 'भाजपच्या कामामुळे देशभर सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. साहजिकच प्रत्येकजण या पक्षाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी बनण्याचे स्वप्न पाहतात. त्यादृष्टीने प्रयत्न करतात. मात्र पक्षाची प्रक्रिया समान असते. सर्वच लोकांचा उमेदवारीसंदर्भात विचार करणे शक्य नाही. सर्व्हे केला जातो. म्हणूनच भाजप प्रत्येक निवडणूक जिंकत पुढे जात आहे. ही पोटनिवडणूक आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकू. कार्यकर्त्यांच्या सल्ल्याने निर्णय : विश्वनाथ दळवी याविषयी विश्वनाथ दळवी म्हणाले की, 'कार्यकर्त्यांच्या सहकार्यावर व त्यांनी घेतलेल्या मेहनतीवरच माझी आजची ओळख निर्माण झाली आहे. कार्यकर्ते सर्वोच्च स्थानी आहेत. हितचिंतक व समर्थक जो काही निर्णय घेतील, त्यावर विचारमंथन करू. उमेदवारी न मिळाल्याने मला धक्का बसला आहे. सावरण्यासाठी मला किमान बारा तास लागतील.
पोंडा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून रितेश नाईक यांची उमेदवार म्हणून घोषणा
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.