Achira News Logo
Achira News

प्रेरणा पुरस्कारः युवा नवोन्मेषासाठी एक राष्ट्रीय मंच

Sakal
प्रेरणा पुरस्कारः युवा नवोन्मेषासाठी एक राष्ट्रीय मंच
Full News
Share:

-अविनाश साबापुरेयवतमाळ :आजूबाजूला समस्या दिसतात, त्या सोडविण्याचे उपायही सूचतात... पण करणार काय? आमचे कोण ऐकणार? असा गुंता तरुणांच्या मनात नेहमीच असतो. पण आता ही कोंडी फुटणार आहे. कोट्यवधी तरुणांच्या मनातील ‘आयडिया’ एकाच मंचावर गोळा करुन त्यातील दर्जेदार कल्पनांवर अंमलबजावणी होणार आहे. अन् या सोहळ्याचे नाव आहे ‘इन्स्पायर अवार्ड’!केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्रात नागपूरच्या राज्य विज्ञान शिक्षण संस्थेमार्फत त्यावर काम केले जात आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या ‘कोर्‍या’ मनात असंख्य नवकल्पना जन्म घेतात. त्या गोळा करून त्यातील उत्तम संकल्पनांना सन्मानित केले जाते. यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेत अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही सामील करुन घेतले जाणार आहे. त्यामुळे इयत्ता सहावीच्या बालकांपासून तर बारावीच्या नवतरुणांपर्यंत सर्वांना आपली सर्जनशीलता राष्ट्रीय पातळीवर मांडण्याची संधी मिळणार आहे. रस्त्यावरची विस्कळीत वाहतूक, वेळी अवेळी जाणारी वीज, वारंवार बिघडणारा मोबाईल, खेड्यापाड्यातील नागरिकांना दूर पडणारी बाजारपेठ या आणि अशा कोणत्याही समस्यांवर तरुणांच्या मनात ‘सोल्यूशन’ असू शकते. तेच ‘सोल्यूशन’ सांगणारी संकल्पना त्यांना या स्पर्धेत मांडायची आहे.त्यासाठी 15 जूनपासून www.inspireawards-dst.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही माध्यमाच्या कोणत्याही व्यवस्थापनाच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ही नोंदणी खुली आहे. त्यामुळे तरुणांना आपला ‘कल्पनाविलास’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सत्यात उतरविण्याची संधी आली आहे.महाराष्ट्रातील शाळांमध्ये इन्स्पायर मानक योजनेची माहिती देऊन विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. हर्षलता बोरुडे यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील संकल्पना गोळा करण्यासाठी प्रत्येक शाळेत एक ‘आयडिया बॉक्स’ लावावा. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना लिहून त्यात टाकाव्या. त्यातून उत्तम संकल्पना शाळेने एकत्र कराव्या. विद्यार्थ्यांच्या कच्च्या कल्पना विकसित करण्यासाठी शाळेने मार्गदर्शन करावे. त्यानंतर त्यांची नोंदणी शासनाच्या पोर्टलवर करावी, असे निर्देश आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Sakal

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

प्रेरणा पुरस्कारः युवा नवोन्मेषासाठी एक राष्ट्रीय मंच | Achira News