Achira News Logo
Achira News

बाराव्या इयत्तेच्या निकालांमध्ये लातूर बोर्डाची खराब कामगिरी स्पर्धात्मक परीक्षांमधील भक्कम कामगिरीच्या तुलनेत वेगळी आहे

Lokmat
बाराव्या इयत्तेच्या निकालांमध्ये लातूर बोर्डाची खराब कामगिरी स्पर्धात्मक परीक्षांमधील भक्कम कामगिरीच्या तुलनेत वेगळी आहे
Full News
Share:

राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल यंदाही नेहमीप्रमाणे मुलींची गुणवत्ता सिद्ध करणारा ठरला, तर राज्याच्या निकालात मराठवाड्यातील लातूर बोर्ड पुन्हा एकदा इतर विभागीय मंडळांच्या तुलनेत तळाला राहिले. जोवर बोर्डाच्या गुणांवर वैद्यकीय, अभियांत्रिकीसह व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश निश्चित होत होते, तोवर निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले? तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या बोर्डात लातूरचा निकाल सुमारे ९० टक्के आहे. परंतु इतर दोन जिल्ह्यांच्या निकालाची टक्केवारी मागे पडल्याने बोर्डाचा सरासरी निकाल घसरला. त्याहून अधिक महत्त्वाचा मुद्दा, विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम, पॅटर्न बदलला आहे. तळ गाठणारे बोर्डाचे क्षेत्र नीट, जेईईमध्ये मात्र शिखरावर आहे. हीच सध्याच्या निकालाची दुसरी बाजू आहे. एमबीबीएस, बीएएमएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय जागांवर गुणवत्तेवर प्रवेश निश्चित होणाऱ्या यावर्षीच्या राज्यातील एकूण २० हजार ९६३ गुणवंतांमध्ये मराठवाड्यात शिक्षण घेतलेले ७ हजार ९९२विद्यार्थीआहेत. स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांकडे ओढा आहे. त्यामुळे मूलभूत शिक्षण आणि त्याचे शिक्षणक्रम, अभ्यासक्रम, उपक्रम हे कौशल्याच्या दिशेने जाणे गरजेचे आहे. नवे शैक्षणिक धोरण तेच सांगते. परंतु बदलाची गती आणखी वाढवावी लागेल. गुणवत्तेची अपेक्षा ठेवताना, दर्जेदार आणि एका दिशेने जाणारी शिक्षणव्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न, प्रयोग सतत करत राहावे लागतील. जे खासगी शिकवण्यांमध्ये मिळते ते शाळा, महाविद्यालयांत का मिळत नाही, हा प्रश्न विचारणारा पालक खासगी शिकवणी वर्गाच्या दारात का उभा राहतो? शाळा, महाविद्यालये कमी पडतात, की विद्यार्थ्यांच्या आधी पालकांना स्पर्धा जिंकायची आहे? प्रश्न असंख्य आहेत, मात्र वास्तव हेच आहे की खासगी, समांतर शिक्षणव्यवस्था उभी आहे. बहुतांश पालकांना ती गरजेची वाटते. यावर अनेक बाजूंनी मत-मतांतरे होतील, परंतु शाळा, महाविद्यालयांतील शिक्षण अबाधित ठेवून पुढे जाणे हिताचे आहे. अन्यथा महाविद्यालयांतील प्रवेश नॉमिनल की बोर्डच ‘नॉमिनल’ (नावापुरते) या प्रश्नाचा अभ्यास शिक्षण खात्याला करावा लागेल. एकंदर बारावी बोर्डात किमान गुण मिळवूनविद्यार्थीप्रवेशपूर्व परीक्षांकडेच लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत. त्याचवेळी बोर्ड आणि प्रवेश परीक्षा हे दुहेरी ओझे विद्यार्थ्यांच्या पाठीवर आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या मार्गाने आपण जात असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करता आले पाहिजे. महाराष्ट्रात वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश हवा असेल, तर बारावी बोर्ड परीक्षेत खुल्या जागेवर किमान ५० आणि मागास प्रवर्गासाठी ४० टक्के गुण असावेत, असा निकष आहे. जेईईसाठी मात्र ७५ आणि ६५ टक्के निकष आहे, तर अन्य अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण प्रवेशासाठी ४४.५ आणि ३९.५ टक्के इतकेच गुण हवे आहेत. खरी स्पर्धा सुरू होते ती इथेच ! बारावी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी प्रवेश परीक्षेतील गुणच महत्त्वाचे असल्याने स्वाभाविकच विद्यार्थ्यांचे लक्ष प्रवेशपूर्व परीक्षांकडे वळले आहे. कमी-अधिक फरकाने कला, वाणिज्य क्षेत्रातील व्यावसायिक उच्चशिक्षणासाठी तीच स्थिती आहे. एक परीक्षा-एक अभ्यासक्रम असावा, मग बोर्ड कोणतेही असो. त्याही पुढे जाऊन सर्व प्रवेश परीक्षांचे मार्ग दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमातूनच पुढे गेले पाहिजेत. तरच बोर्डाच्या पुस्तकांना आणि वर्गांना किमान महत्त्व राहील. तसे करायचे नसेल तर किमान जशा परीक्षा तसा दहावी-बारावीचा अभ्यासक्रम, असे स्वरूप असेल तरच विद्यार्थी वर्गात बसतील. ‘नॉमिनल ॲडमिशन’ आहे, हे सांगताना कोणालाही संकोच वाटत नाही, पुढेही वाटणार नाही. जिथे स्पर्धा तिथे अभ्यास आणि जिथे अभ्यास तिथे गुणवत्ता, हे सरळ सूत्र आहे. दहावीनंतर अकरावीसाठी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ज्या शहरांमध्ये स्पर्धा आहे तिथे दहावी बोर्डाचे महत्त्व अजूनही आहे. शिवाय दहावीनंतर तंत्रशिक्षण आणि अनेक अभ्यासक्रमांचे प्रवेश अवलंबून असल्याने दहावी बोर्ड गुणांची मोजदाद काहीअंशी अजून शिल्लक आहे. आता तिथेही ‘फाउंडेशन कोर्स’ अशी व्यवस्था उभी राहत आहे. दहावीनंतर मात्र कला शाखेचा काही बाबतीत अपवादवगळता विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी बारावी बोर्ड जवळपास नाममात्र ठरले आहे. या साऱ्या प्रश्नांचा अभ्यास करुन पुढे जावे लागणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

बाराव्या इयत्तेच्या निकालांमध्ये लातूर बोर्डाची खराब कामगिरी स्पर्धात्मक परीक्षांमधील भक्कम कामगिरीच्या तुलनेत वेगळी आहे | Achira News