68-year-old Mangala Thoke from Mumbai passed the HSC 2026:‘लहानपणी शिक्षण पूर्ण करता आले नाही. संसार सुरू झाला, तरी मनात शिक्षण कमी असल्याची बोच होती. अखेर रात्रशाळा आणि रात्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या मदतीने वयाच्या ६८व्या वर्षी का होईना, पण बारावी उत्तीर्ण झाले आणि कृतकृत्य वाटले...,’ विक्रोळी येथे चहाचे छोटे दुकान चालवणाऱ्या मंगला ठोके अभिमानाने सांगत होत्या. मंगला यांनी थोडेथोडके नाही, तर ६० टक्के गुण मिळवत हे यश संपादन केले. रात्रशाळा आणि रात्र महाविद्यालयाच्या पाठिंब्यामुळेच त्यांना ही मजल मारणे शक्य झाले.विक्रोळी येथे राहणाऱ्या मंगला ठोके जवळच्याच सरस्वती शाळेत शिपाई म्हणून काम करत होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. पाच मुलींची जबाबदारी असल्याने त्यांनी निवृत्तीनंतर चहाचे छोटे दुकान सुरू केले. तरीही शिक्षणाची आस स्वस्थ बसून देत नव्हती. अखेर कांजूरमार्ग येथील एका रात्रशाळेत आठव्या इयत्तेत प्रवेश घेत त्यांनी शिक्षणाचा थांबबलेला प्रवास पुन्हा सुरू केला.‘लहानपणी घरची परिस्थिती बेताची होती. त्यातच कुटुंबाची जबाबदारीही आल्याने शिक्षण खंडित झाले होते. नंतर संसारात गुरफटून गेले. तरीही शिकावे, असे वाटत होते. नोकरीही शाळेतच असल्याने आसपास वावरणाऱ्या विद्यार्थ्यांकडे पाहून आपणही पुन्हा वही-पुस्तक हाती घ्यावे असा विचार यायचा. मात्र पदरी पाच मुली होत्या आणि पतींचेही निधन झाले. त्यामुळे तेव्हा ते शक्य झाले नाही,’ असे मंगलाताई सांगतात."खर्च करू नका, ही वाचणार नाही" म्हणणाऱ्यांना दिलं चोख उत्तर! नागपूरच्या दोन रणरागिणींची बारावीत दैदीप्यमान कामगिरीअखेर निवृत्तीनंतर काही वर्षांनी त्यांनी कांजूरमार्गच्या रात्रशाळेत प्रवेश घेतला. तेथून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मंगलाताईंनी विक्रोळीच्या शारदा नाइट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे प्रवेश घेत स्वप्नाच्या दिशेने आगेकूच केली. घरकाम, जबाबदाऱ्या आणि वयानुरूप येणाऱ्या अडचणी यांवर मात करत त्यांनी ध्येय गाठले. या यशात माझ्या पाचही मुलींचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी ही मजल मारू शकले, असे मंगलाताई यांनी सांगितले.प्रेरणादायी कामगिरी‘शारदा नाइट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजसारख्या रात्रशाळा संस्थांमुळे अनेक वर्षे शिक्षणात खंड पडलेल्या विद्यार्थ्यांना आधार मिळतो. मंगला ठोके या आपल्या ‘विद्यार्थिनी’ने शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हे सिद्ध केले आहे. त्यांची ही कृती अनेक महिलांना पुन्हा शिकण्यासाठी प्रोत्साहन देईल,’ अशी अपेक्षा मुख्याध्यापक दत्तात्रय सोनावणे यांनी व्यक्त केली.
भारतीय महिलेने वयाच्या 68 व्या वर्षी शिक्षण पूर्ण करण्याचे आयुष्यभराचे स्वप्न पूर्ण केले
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.