पिंपरी :भंडारा डोंगराच्या पायथ्याशी झालेल्या सप्ताहाला आलेल्या भाविक महिलांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चार महिलांना दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी अटक केली. या कारवाया शनिवारी (३१ जानेवारी) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुदवडी गावच्या हद्दीत करण्यात आल्या. पहिल्या प्रकरणात माया सुहास गुरव (४५, डोळसनाथ मंदिराजवळ, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वत्सला संपत गायकवाड (३५, एकनाथवाडी, पाथर्डी, अहिल्यानगर) आणि कस्तुराबाई भागवत लोखंडे (४५, एकनाथवाडी, पाथर्डी, अहिल्यानगर) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या तोंडओळखीचे असून ते भजनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या गळ्यातील आणि इतर महिलांचे असे एकूण ४७ ग्रॅम वजनाचे २ लाख ८२ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी तात्काळ महिलांचा शोध घेत त्यांना अटक केली. दुसऱ्या प्रकरणात शांताबाई दत्तात्रय चव्हाण (६६, इंदोरी, मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गौळण पांडुरंग गायकवाड (४०, माउली नगर, बीड) आणि प्रीती अंबादास माहिते (३२, नडे कॉलनी, काळेवाडी) यांना अटक केली आहे. आरोपींनी भजनाच्या कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी आणि इतर महिलांच्या गळ्यातील ६२ ग्रॅम वजनाचे ३ लाख ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत सुपरवायझरला खोटी माहिती का देतो, या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला मारहाण करण्यात आली. या मारहाण प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी (१ फेब्रुवारी) रात्री चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली. या प्रकरणात २२ वर्षीय तरुणाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र दोघे घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. “आमच्याबद्दल सुपरवायझरला खोटी माहिती का देतो,” असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी फिर्यादीच्या मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी “तू मध्ये का आलास, तुला मारूनच टाकतो,” असे धमकावून त्याच्या पोटात चाकू खुपसला. या हल्ल्यात फिर्यादीचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत. सोमटणे फाटा येथे भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत एका ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (१ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जुना पुणे-मुंबई हायवेवर मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर घडली. बाबासाहेब रामभाऊ जाधव (५३) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात रोहित हनुमंत बजगुडे (२९, शोभा नगर, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कंटेनर चालक लाल शेखर यादव (ईसापूर, आजमगड, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब जाधव हे आपल्या दुचाकीवरून बाजारात जात होते. यावेळी आरोपीने आपल्या ताब्यातील कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात जाधव हे वाहनाखाली आल्याने त्यांच्या पोटावरून चाक गेले आणि गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत. चऱ्होलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त चऱ्होली बुद्रुक येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली. ही कारवाई शनिवारी (३१ जानेवारी) सायंकाळी खालचा मळा, चोविसावाडी येथे करण्यात आली. पोलीस शिपाई अनिल जोशी यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या कारवाईत १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पत्र्याच्या बंदिस्त शेडमध्ये तीन पत्ती नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा एकूण १३ लाख ६१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. छाप्यावेळी ७ ते ८ जण पळून जाण्यात यशस्वी झाले असून दिघी पोलीस तपास करत आहेत. बेकायदेशीरपणे गावठी दारू विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका महिलेवर वाकड पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई रविवार (१ फेब्रुवारी) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वेणुनगर येथील गणपती मंदिराजवळील मोकळ्या जागेत करण्यात आली. या प्रकरणात पोलीस शिपाई दीपक शिरसाट यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ७२ लिटर गावठी गावठी दारू विक्रीसाठी घेऊन थांबली होती. पोलिसांनी तिच्याकडून ७ हजार २०० रुपये किमतीची दारू जप्त केली असून तिला नोटीस बजावण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.
महिला यात्रेकरूंकडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चार महिलांना पिंप्री पोलिसांनी अटक केली आहे.
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.