अहेरी/ एटापल्ली :आरोग्य सुविधेचा दुष्काळ आणि खड्डेमय रस्त्यांचा शाप काय असतो, याचा विदारक अनुभव पुन्हा एकदा दुर्गम एटापल्ली तालुक्यात ४ मे रोजी आला. घरगुती कारणावरून विष प्राशन केलेल्या एका माऊलीला वाचवण्यासाठी तिच्या नातेवाईकांनी तिला चक्क दुचाकीवर आडवे ठेऊन सुसाट वेगाने सहा किमी अंतर कापून रुग्णालय गाठले. 'लोकमत'चे अहेरी तालुका प्रतिनिधी प्रतीक मुधोळकर यांनी माणुसकीच्या नात्याने स्वतः रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग हाती घेऊन शर्यत लावली, मात्र दुर्दैवाने या संघर्षात प्रयत्न हरले आणि मृत्यू जिंकला ! मीरा गणेश लेखामी (२५,रा. कांदोळी ता. एटापल्ली) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. एटापल्ली तालुक्यातील बुर्गी-कांदोळी मार्गावर ४ मे रोजी दुपारी १२ वाजता एका दुचाकीवर दोघे जण मीरा लेखामी यांना आडवे पकडून जीवाच्या आकांताने येत होते. त्याचवेळी समोरून खासगी कामासाठी दुचाकीवरुन येणारे 'लोकमत'चे प्रतिनिधी प्रतीक मुधोळकर यांना हे दृश्य दिसले. त्यांनी दुचाकी वळवून पाठलाग करत विचारणा केली असता, महिलेने विष घेतल्याचे समजले. मुधोळकर यांनी त्यांना ओव्हरटेक करत तात्काळ सहा बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून डॉक्टरांना सतर्क केले. रुग्णवाहिकेचा चालक रजेवर, 'सक्शन'ची नळीही खराब बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. गीतांजली खिरटकर यांनी यंत्रणा सज्ज ठेवली, पण विषारी द्रव पोटाबाहेर काढण्यासाठीच्या सक्शन या यंत्राची नळी खराब होती, त्यामुळे त्यांना तात्काळ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात हलविण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, त्याचवेळी रुग्णवाहिकेचा चालक रजेवर असल्याने मोठी अडचण झाली होती. यावेळी 'लोकमत'चे प्रतिनिधी प्रतीक मुधोळकर यांनी रुग्णवाहिकेची चावी द्या, मी त्यांना रुग्णालयात पोहोचवितो, अशी विनंती केली, माणुसकीचा भाग म्हणून डॉ. खिरटकर यांनीही रुग्णवाहिकेची चावी दिली. त्यानंतर मीरा लेखामी यांना घेऊन मुधोळकर यांनी खराब रस्ते आणि खड्ड्यांतून वाट काढत अवघ्या २५ मिनिटांत रुग्णवाहिका एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात पोहोचविली. डॉक्टरांनी शर्थ केली, पण मृत्यूने गाठलेच एटापल्लीत डॉ. उईके आणि त्यांच्या चमूने 'सक्शन'द्वारे विष बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न केले. अर्धा तास ऑक्सिजन आणि उपचारांची झुंज सुरू होती. मात्र, तिची प्राणज्योत मालवली आणि उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
रुग्णालयात नेत असताना महिलेचा मृत्यू झाल्याने पत्रकाराच्या मानवतावादी प्रयत्नांचा शोकांतिका अंत
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.