Achira News Logo
Achira News

हार्दिक पांड्याचे प्रामाणिक मूल्यांकनः मुंबई इंडियन्सचा संघर्ष सुरूच

Loksatta
हार्दिक पांड्याचे प्रामाणिक मूल्यांकनः मुंबई इंडियन्सचा संघर्ष सुरूच
Full News
Share:

Hardik Pandya Statement on MI Defeat:चेन्नई सुपर किंग्सने पुन्हा एकदा यंदाच्या स्पर्धेत पराभवाचं पाणी पाजलं. आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले. मुंबईच्या घरच्या मैदानावर, वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर, चेन्नईने यावेळी आपल्या घरच्या मैदानावर सहज विजय नोंदवला. मुंबई इंडियन्सच्या या सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या काय म्हणाला, जाणून घेऊया. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.मुंबईइंडियन्सने सुरूवातदेखील चांगली केली आणि एकेकाळी संघ २ बाद ९० धावांवर खेळत होता. पण १० षटकांनंतर संघाच्या धावांचा वेग ओसरला आणि चेन्नईने सामन्यावर पकड मजबूत केली. यामुळे मुंबईचा संघ २० षटकांत फक्त १५९ धावा करण्यात यशस्वी ठरला. यानंतर चेन्नई सुपर किंग्सने प्रत्युत्तरात फक्त १८.१ षटकांत सहज सामना जिंकत मुंबई इंडियन्सवर ८ विकेट्सने सोपा विजय मिळवला. मुंबई इंडियन्सला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सर्व सामने जिंकण्याची गरज असताना हा पराभव संघासाठी मोठा डोकेदुखी ठरणार आहे. रवी शास्त्री यांनी सामन्यानंतर प्रश्न विचारताना हार्दिकला म्हटलं, आज तुमचा दिवस नव्हता, यावर हार्दिक म्हणाला, “मला वाटतं हे फक्त आजच्या दिवसाचं नाही, तर हा संपूर्ण हंगामच आमच्यासाठी नाहीये. त्यांनी आमच्यापेक्षा चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी केली.” या खेळपट्टीवर १८०-१९० हा पार स्कोअर होता का?, यावर प्रश्नावर उत्तर देताना हार्दिक म्हणाला, “हो, एका टप्प्यावर आम्ही १८०-१९० धावांपर्यंत जाण्याचा विचार करत होतो. तो चांगला स्कोअर ठरला असता. पण १० षटकांनंतर आम्ही गती मिळवू शकलो नाही आणि शेवटही चांगला करता आला नाही.” १८०-१९० धावांपर्यंत पोहोचता का आलं नाही, यामागचं कारण सांगताना कर्णधार म्हणाला, “सुरुवातीपासूनच फटके मारणं सोपं नव्हतं. त्यांच्या फलंदाजांनाही सेट झाल्यानंतर लगेच गोलंदाजांविरूद्ध मोठे फटका खेळता आले नाहीत. त्यामुळे मोजून-मापून खेळणं गरजेचं होतं आणि योग्य विकेट्स हातात ठेवणं महत्त्वाचं होतं. पण आमचे फलंदाज नीट खेळू शकले नाही आणि त्यांच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. एकूणच, ते गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये आमच्यापेक्षा सरस ठरले.” अधिक आक्रमक गोलंदाजी व्हायला हवी होती का, या प्रश्नावर हार्दिक म्हणाला, “आम्ही किती आक्रमक होऊ शकलो असतो, हे सांगणं कठीण आहे. त्यांना बाद करण्यासाठी कदाचित ‘फायरबॉल’ टाकावे लागले असते! पण आमच्याकडे जे पर्याय होते, त्यानुसार आम्ही गोलंदाजी केली. त्यांनी मात्र खूप स्मार्ट क्रिकेट खेळलं आणि तोच फरक ठरला.”

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

हार्दिक पांड्याचे प्रामाणिक मूल्यांकनः मुंबई इंडियन्सचा संघर्ष सुरूच | Achira News