सेबॅस्टियन सवेने लंडन मॅरेथॉन दोन तासांच्या आत पूर्ण करून नवा विक्रम केला
चीनमध्ये कुठल्याशा स्पर्धेत एका रोबोने मानवी स्पर्धकांना हरवून दाखवले असले तरी मानवी क्षमतांवरील प्रेम, आशा कमी होणार नाही याचाच जणू भरवसा ही माणसे देत आहेत. तसे पाहता मॅरेथॉन ही वेगापेक्षाही चिकाटी आणि शारीरिक सहनशक्तीची सत्त्वपरीक्षा पाहणारी शर्यत. तरीदेखील गेल्या काही दिवसांमध्ये या शर्यतीविषयी बातम्या वेगाच्या संदर्भानेच माध्यमांमध्ये झळकल्या. कारण स्पर्धात्मक परिप्रेक्ष्यात प्रथमच एखाद्या मानवाने मॅरेथॉनसाठी आवश्यक ४२.१९५ किलोमीटर अंतर दोन तासांच्या आत पूर्ण केले. त्या मानवोत्तमाचे नाव सेबॅस्टियन सावे. तो केनियाचा. जगप्रसिद्ध लंडन मॅरेथॉनमध्ये गेल्या रविवारी सावेने १.५९.३० तास (एक तास ५९ मिनिट ३० सेकंद) अशी वेळ नोंदवली. ॲथलेटिक्समध्ये १०० मीटर्सची शर्यत दहा सेकंदांच्या आत पूर्ण करणे मानवाला बर्याच आधी साधले. पण मॅरेथॉन दोन तासांच्या आत पूर्ण करणे या आव्हानाचे आकर्षण दीर्घकाळ होते. दोन तासांच्या आत एखाद्याने मॅरेथॉन पूर्ण करण्याची ही पहिली वेळ नव्हती. केनियाच्याच एलियुद किपचोगेने २०१९ मध्ये व्हिएन्नात १.५९.४० तासात पूर्ण केली होती. ती शर्यतदेखील दोन तासांच्या आत पूर्ण झाली, तरी तिचे स्वरूप प्रदर्शनात्मक होते. निकषांमध्ये सूट होती. काही सवलती घेण्यात आल्या आणि मुख्य म्हणजे, संबंधित वेळ अधिकृत नसेल हे आधीपासूनच ठरलेले होते. तरीदेखील त्यावेळी ‘दोन तासांच्या आत मॅरेथॉन’ या आव्हानाचे क्षितिज खुणावू लागले होते. या किपचोगेने वर्षभर आधी बर्लिन मॅरेथॉनमध्ये २.०१.३९ तास अशी वेळ नोंदवून त्या वेळचा जागतिक विक्रम मोडला होता. याच किपचोगेने नंतर २०२२ मध्ये बर्लिन मॅरेथॉनमध्येच २.०१.०९ अशी वेळ नोंदवून स्वत:चाच जागतिक विक्रम मोडला नि नवा प्रस्थापित केला. तेव्हा ही वेळ त्याच्या बहुतेक सर्व समकालीनांच्या आवाक्याबाहेरची असल्याचे बोलले जाऊ लागले. पण किपचोगेचा तो विक्रम अल्पायुषी ठरला. कारण पुढच्या वर्षी शिकागो मॅरेथॉनमध्ये केनियाच्याच केल्विन किप्तमने २.००.३५ तासांची वेळ नोंदवून खळबळ उडवून दिली. दुर्दैवाने या किप्तमचा पुढील वर्षी अपघाती मृत्यू झाला. अन्यथा किपचोगे-किप्तम यांच्यातील द्वंद्व फेडरर-नडाल यांच्या द्वंद्वाइतकेच लक्षणीय ठरू शकले असते. या घडामोडींचा परामर्श घेता दोन तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करण्याची कामगिरी दृष्टिपथात आली होती. सेबॅस्टियन सावेने ती प्रतीक्षा संपुष्टात आणली. त्या लंडन मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे, योमिफ केजेल्चा या इथियोपियाच्या धावपटूनेही ती १.५९.४१ तासात शर्यत पूर्ण केली. या मॅरेथॉनमध्ये अशा रीतीने दोन तासांच्या आत शर्यत पूर्ण करणारे दोन धावपटू निघाले. तर युगांडाच्या जेकब किप्लिमोने २.००.२८ तास अशा वेळ नोंदवली. म्हणजे तब्बल तीन धावपटूंनी एकाच शर्यतीत जागतिक विक्रम (किप्तम – २.००.३५ तास) मोडला. या सर्वच घडामोडी अभूतपूर्व होत्या. धावणे हा प्रकार मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यात सर्वाधिक आदिम. जीव वाचवण्यासाठी, भक्ष्य मिळवण्यासाठी कपि वानराचा मानवप्राणी होत असताना, दोन पायांवर उभे राहणे, चालणे आणि धावणे हे अत्यंत महत्त्वाचे टप्पे ठरले. किंबहुना, कित्येक चतुष्पाद प्राण्यांच्या तुलनेत कितीतरी अधिक कमकुवत असूनही द्विपाद मानवाने खंडप्राय वाटचाल केली आणि पृथ्वी पादाक्रांत केली. पुढे नौकानयन आणि हवाई उड्डाणांच्या जोरावर सागरी, महासागरी अडथळेही पार केले. तरीदेखील स्वत:च्या पावलांवर उभे राहणे, चालणे आणि धावणे या क्रियांबरोबरची आपली नाळ कधीच तुटली नाही. मॅरेथॉन ही निव्वळ धावण्याची स्पर्धा नाही. तिच्यात अंतर्भूत असलेले ४२ किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण करणारे पृथ्वीतलावर अत्यल्पसंख्याक ठरतात. म्हणून त्या आव्हानाविषयी आकर्षणही सर्वव्यापी. मॅरेथॉनपटूंविषयी आदर सर्वंकष. पावलापासून हृदयापर्यंत असंख्य अवयव आणि इंद्रियांची परमकसोटी पाहणारी ही शर्यत पूर्ण करणे यातच कित्येकांना आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते. काहींना या शर्यतीशी प्रतीकात्मक साधर्म्य साधणार्या शर्यतींमध्ये (उदा. अर्ध मॅरेथॉन) सहभाग नोंदवून हौस फिटवून घ्यावीशी वाटते. या मॅरेथॉनचे सेलेब्रिटी मॅरेथॉन, वॉकेथॉन वगैरे विद्रुपीकरणही हल्ली आजूबाजूला पाहावयास मिळते. तरी मॅरेथॉन ती मॅरेथॉन. ते विश्वच वेगळे. मानवाच्या उत्क्रांतीची सुरुवात आफ्रिका खंडातून झाली असे मानले जाते. विद्यमान मानवही प्रथम तेथेच विकसित झाला असावा. त्या मातीतच बहुधा काही तरी गुण असावा. त्यामुळेच अलीकडच्या काळातील झाडून सगळे विजेते केनिया, इथियोपिया, युगांडा, टांझानिया, इरिट्रिया या आफ्रिकी देशांतलेच. त्यातही चर्चा होते ती केनियातील रिफ्ट व्हॅली या प्रदेशाची. जवळपास ६०-७० टक्के मॅरेथॉन विजेते – पुरुष आणि महिला – या प्रदेशात वाढलेले आहेत. हे गणित किंवा गुपित नेमके काय याविषयी परदेशी विद्यापीठांमध्ये खोर्याने संशोधने होत असतात. कित्येक आघाडीचे मॅरेथॉनपटू रिफ्ट व्हॅलीमध्ये जाऊन सराव करतात. समुद्रसपाटीपासून आठेक हजार फुटांवर वसलेला तो डोंगरदर्यांचा प्रदेश मॅरेथॉनपटू निपजण्यासाठी आदर्श ठरतो, म्हणे. तिथल्या लोकांना याचे काही सोयरसुतक नसते. शाळा कुठे तरी दूरवर, तिथे वेळेत पोहोचायचे तर धावतच जावे लागणार. शेतांमध्ये, रोजगारासाठी पायपीट करावी लागते. कदाचित आल्हाददायक, कोरड्या हवेमुळे चालण्याऐवजी धावण्याकडे कल वाढला असेल. संध्याकाळी अंधार लवकर होतो म्हणून माघारीच्या रस्त्यावरही धाव. कधी धान्यकेंद्रांवर जिन्नस लवकर संपते म्हणून ते मिळवण्यासाठी धाव. कधी कुट्ट काळोख पडला तर श्वापदांचे भय म्हणून धाव. कधी काहीच निराळा उद्योग नाही म्हणून धाव. अनेक रिफ्टवासीयांचा दिवस धावण्यात सुरू होतो नि धावण्यातच संपतो. त्यामुळेच तिथे वाढलेल्या बहुतेक सर्व मॅरेथॉन विजेत्यांना, ते जिंकल्यानंतर पत्रपरिषदांमध्ये ‘जिंकण्यासाठी करता काय, खाता काय’ या प्रश्नावर नेमके उत्तरच देता येत नाही! ही साधासुधी माणसं धावतात नि जिंकतात… बॉस्टन, लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, बर्लिन, टोक्यो, सिडनी या सात प्रमुख मॅरेथॉनमध्ये, ऑलिम्पिकमध्ये, जागतिक स्पर्धांमध्ये, मुंबईसारख्या अलीकडच्या मॅरेथॉन स्पर्धांमध्येही… म्हणून त्या विजयांची झळाळी निराळी, खुमारी वैश्विक. मॅरेथॉन या संकल्पनेचा जन्म झाला ग्रीको-रोमनांच्या गोर्या संस्कृतीत. एका सुपरिचित आख्यायिकेनुसार, फिडिपिडेस या ग्रीक निरोप्या-सैनिकाने पर्शियाच्या पराभवाची वार्ता ग्रीकांना त्वरित समजावी म्हणून धावायला सुरुवात केली. युद्धभूमी होती मॅरेथॉन या किनारी प्रदेशात. फिडिपिडेसला पोहोचायचे होते अथेन्स शहरात. इसवीसन पूर्व ४९० मध्ये झालेली ती लढाई इतिहासात नोंदवली गेली आहे. फिडिपिडेसच्या आख्यायिकेबाबत मात्र अनेक प्रवाद आहे. मॅरेथॉन ते अथेन्स हे अंतर जवळपास ४० किलोमीटरचे होते. फिडिपिडेस धावतच अथेन्सला पोहोचला खरा. पण आनंदवार्ता सांगून अतिश्रमाने तेथेच कोसळला आणि प्राणपारखा झाला. आनंदवार्तेची शोकान्तिका झाली. पण ती कहाणी शेकडो वर्षे प्रेरक ठरत आली. अथेन्सला १८९६ मध्ये पहिल्यांदा आधुनिक ऑलिम्पिक भरवले गेले, त्यावेळी मॅरेथॉन ते अथेन्स असाच मार्ग निवडण्यात आला नि ‘मॅरेथॉन’ या क्रीडा प्रकाराचा जन्म झाला. त्या स्पर्धेत स्पायरीडॉन लुइस या ग्रीक विजेत्याने नोंदवलेली वेळ होती २.५८.५०. तासांची. पुढे १०८ वर्षांनी २००४ मध्ये अथेन्सलाच दुसर्यांदा ऑलिम्पिक भरवले गेले, त्यावेळी स्टेफानो बाल्डिनी या इटालियान विजेत्याने २.१०.५५ तासात मॅरेथॉन पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. म्हणजे १०० वर्षांत ५० मिनिटे नि गेल्या वीसेक वर्षांत १० मिनिटे असा हा घटत्या वेळेचा आलेख. तो मानवाच्या शारीर आणि तांत्रिक प्रगतीचाही निदर्शक. कृत्रिम प्रज्ञेच्या काळात विशिष्ट मानवी क्षमतांची आणि कौशल्यांची गरज किती असे प्रश्न उपस्थित होत आहेत, तिकडे चीनमध्ये कुठल्याशा स्पर्धेत एका रोबोने मानवी स्पर्धकांना हरवून दाखवले. तरीदेखील मानवी क्षमतांवरील प्रेम, आशा कमी होणार नाही याचाच जणू भरवसा ही वेगे वेगे धावणारी माणसे देत आहेत. तो निश्चितच आश्वासक.